फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षासाठी राज्य मंडळाची अधिकृत घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राबविण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
- इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 23 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेतल्या जातील.
- इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत.
गुण नोंदणी व सादरीकरणाबाबत महत्वाच्या सूचना
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे गुण बैठक क्रमांकानुसार ऑनलाइन प्रणालीत नोंदवून त्याची अंतिम यादी तयार करावी. या यादीवर पुढीलप्रमाणे स्वाक्षऱ्या घेणे आवश्यक आहे —
- अंतर्गत व बाह्य परीक्षक
- संबंधित विषय शिक्षक (तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी)
- मुख्याध्यापक / प्राचार्य
त्यानंतर संबंधित गुणतक्ते सिलबंद पाकिटामध्ये विभागीय मंडळाकडे ठरवून दिलेल्या तारखेला सादर करावेत. पाकिटावर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
अतिविलंब शुल्क व विषय बदल केलेल्या विद्यार्थ्यांबाबत
अतिविलंब शुल्क भरून अर्ज केलेल्या, परंतु ज्यांचे बैठक क्रमांक अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, तसेच ऐनवेळी विषय बदल केलेल्या विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित ऑफलाइन पद्धतीने निश्चित मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.
‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा संदर्भातील नियम
गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेसाठी ‘आऊट ऑफ टर्न’ पद्धतीने प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व तांत्रिक परीक्षा संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच घेण्यात येणार आहेत.
नियमित कालावधीत अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाच आऊट ऑफ टर्न परीक्षेसाठी बैठक क्रमांक उपलब्ध करून दिले जातील. या विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाइन प्रणालीतील ‘Out of Turn’ पर्यायातून नोंदविणे बंधनकारक आहे.
शाळा-महाविद्यालयांची जबाबदारी
सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी —
- गुण भरण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेबाबत सर्वसाधारण सूचना शिक्षक व कर्मचाऱ्यांना द्याव्यात
- गुण कसे व कोणत्या पद्धतीने मंडळाकडे पाठवायचे याची स्पष्ट माहिती द्यावी
- या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळ कार्यालयास सादर करावा
असे स्पष्ट निर्देश डॉ. दीपक माळी यांनी दिले आहेत.